: सहकारनामा ऑनलाईन
– एका अफवेमुळे संपूर्ण पोल्ट्रीजगतावर आर्थिक संकट ओढवले होते मात्र आता काही दिवसांपासून चिकनच्या बाजारभावात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पोल्ट्री चालकांकडून जिवंत कोंबडीचा दर प्रती किलो ७० रुपयांच्या आसपास सुरू झाला असून दुकानावर ग्राहकांना तो १४० ते १६० रुपये प्रती किलोने मिळत आहे. चिकनच्या बाजारभावात वाढ झाल्याने पोल्ट्रीफार्म चालकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार होण्या अगोदर चिकनचा दर १८० रुपये किलोपर्यंत गेला होता मात्र सोशल मीडियावर फोटोंसह अफवा पसरविली गेल्याने हा दर थेट ५० रुपये किलोपर्यंत खाली आला होता. दौंड तालुक्यातील अनेक दुकानांवर मागील २० दिवसांपूर्वी चिकनचा दर ५० रुपये प्रतीकिलो तर जिवंत बॉयलर कोंबडीचा दर १५ रुपये प्रती किलो झाल्याने पोल्ट्रीधारकांना मोठा फटका बसत होता. एक वेळ अशी आली होती की पोल्ट्रीफार्म चालक १० ते १२ रुपये किलोने सुद्धा कोणी विकत घेणारे मिळत नव्हते. त्यामुळे पोल्ट्रीफार्म चालकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.
आता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली असून आता चिकन घेणारे आणि खाणारे वाढले आहेत पण विकाणाऱ्याला कोंबड्या मिळत नसल्याने दर वाढू लागले आहेत. काही दिवसांतच हा दर आता १७० किलोच्या पुढे गेला आहे. कारण आता अनेक पोल्ट्रीचालकांनी आपले पोल्ट्रीफार्म बंद केले असून अनेक पोल्ट्रीफार्मला टाळे लावण्यात आले आहे. यामुळे कंपन्यांनी सुद्धा अंडी उबवणे बंद केले आहे. त्यामुळे चिकनचा तुटवडा भासू लागला असून आता चिकनचे दर वाढत जातील यात शंका नाही.