रेल्वेलाईन जवळ फेकून दिलेल्या चिमुरडीला मिळाला मुंडे-सुळेंच्या मायेचा आधार



बीड : सहकारनामा ऑनलाइन

– परळीतील रेल्वे रुळाजवळील झुडपात फेकून दिलेल्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाचं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकत्व स्वीकारलं आहे. शिवकन्या असं या मुलीचं नाव ठेवलं असून तिचा संपूर्ण खर्च हे दोघेजण करणार आहेत. परळीच्या बरकत नगर भागात असणाऱ्या रेल्वे रुळाजवळील झुडपात सोमवारी सायंकाळी हे स्त्री अर्भक आढळून आले होते. चिमुरडीच्या रडण्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना हे नवजात अर्भक सापडले होते. नागरिकांनी या अर्भकाला उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या तपासणीत काही तासांपूर्वीच या चिमुरडीचा जन्म झाल्याचं आढळून आलं होतं. या घटनेची माहिती  धनंजय मुंडे यांना मिळताच त्यांनी स्वत: पोलीस आणि डॉक्टरांशी संपर्क साधून या अर्भकाचं पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. तर अशीच माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाल्यानंतर या अर्भकाचं पालकत्व घेण्याची इच्छा त्यांनीही व्यक्त केली होती. त्यामुळे अवघ्या काही तासांत आई-वडिलांना पारखं झालेल्या या शिवकन्येला पालकांचं छत्रं मिळालं.

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांनी या मुलीचं पालकत्व घेतल्याचं बीड जिल्हा राष्ट्रवादीने ट्विटरवरून जाहीर केलं आहे. या मुलीवरील उपचाराचा खर्च, तिचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी मुंडे आणि सुप्रिया सुळे करणार असल्याचं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या मुलीवर सध्या उपचार सुरू असून ती सुखरूप आहे.