दुःख होते, पण नाईलाज आहे. हात जोडून विनंती करतो, जीवाशी खेळू नका : कारवाई करताना दौंडचे पोलीस निरीक्षक झाले भावनिक



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

– आज गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी दौंड शहर पोलिसांनी कारवाई करत २५ वाहने जप्त केली यामध्ये २ चारचाकी आणि ३ रिक्षांचाही समावेश होता. ही कारवाई केल्यानंतर दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे काहीसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मग या कारवाईमध्ये सापडलेल्या रिक्षा चालकांच्या रोजीरोटीवरून म्हणा किंवा अन्य काही कारण असेल पण या कारवाई नंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे भावनिक होऊन ग्रुपवर आवाहन करत होते. त्यांनी आपल्या भावना शब्दांमध्ये मांडताना भविष्यामध्ये एखादी शस्त्रक्रिया करावी लागू नये म्हणून आम्ही आमच्या हृदयावर दगड ठेवून हे तुम्हाला छोटेसे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारवाया होत असताना  लोकांना त्रास होत आहे याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे परंतु आम्हा पोलीसांकडे दुसरा इलाज नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. यावेळेस आम्ही हात जोडून  एकच आव्हान करतो की नियम पाळा, आदेशाचे उल्लंघन करू नका आणि कोरोनाचा प्रसार थांबवण्यास मदत करा, जय हिंद,जय महाराष्ट्र. असा हा मेसेज होता. हा मेसेज ते सर्वांना पाठवून भावनिक आवाहन करत होते. या मेसेज मागे ‛खाकी’आड दडलेल्या एका संवेदनशील आणि माणुसकीची जाण असणाऱ्या माणसाचे दर्शन आज सर्वांना होत होते. परंतु त्यांच्या मेसेज मागची तळमळही आता सर्वांनी समजून घेणे गरजेचे बनले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरातच रहाणे हीच सध्या काळाची गरज बनली आहे. अन्यथा कोरोना बाधित झालेल्या दुसऱ्यांच्या बातम्या वाचता, वाचता आपलीही बातमी यायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की.