दौंडच्या ‛कोरोना योद्धा डॉक्टरने’ घेतली दोन महिन्यानंतर कुटुंबाची भेट. सोशल डिस्टन्स पाळून पार्किंगमध्येच घेतले भोजन. दौंडच्या आमदारांनीही केले कौतुक



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

सध्या सर्वत्र कोरोना विषानुने थैमान घातले आहे. कोरोना रोगाशी सर्वात जास्त जवळून जर कोणी युद्ध लढत असेल तर ते रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी असून त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

याच कठीण समयी प्रेरणादायी ठरलेले कोरोना योद्धे म्हणून दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. श्री. संग्राम डांगे यांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल कारण त्यांनी आज जवळपास दोन महिन्यानंतर आपल्या कुटुंबाची भेट घेतली. भेट घेतानाही सुरक्षित अंतर पाळून, घराखाली पार्किंगमध्येच उभे राहून घरचे जेवण केले. डॉ. श्री. संग्राम डांगे यांच्यासारखे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अत्यंत नेटाने आपले कर्तव्य बजावत आहेत. 



अत्यंत आव्हानात्मक काळात समाजाची सेवा करत असल्याने त्यांची दखल दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही घेत त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे व  कोरोना विरुद्ध लढ्यात कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक शासकीय व खाजगी हॉस्पिटल्स मधील सर्व डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यास सलाम करत तशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकून कार्याचे कौतुक केले आहे.