दौंड शहरात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी नाही! दौंडकरांसाठी धोक्याची घंटा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना शहरात बाहेरून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची आरोग्य तपासणी न करताच त्यांना बिनधास्तपणे शहरात प्रवेश दिला जात आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीस होम क्वारंटाइन करणे बंधनकारक असताना सुद्धा दौंड रेल्वे प्रशासन मात्र या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे दौंड शहराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. भुवनेश्वर – मुंबई एक्सप्रेस, दानापूर – पुणे, वास्को – दिल्ली गोवा एक्सप्रेस या महत्वाच्या गाड्यांना दौंड येथे थांबा दिलेला आहे. या गाड्यामधून जवळपास २०० ते ३०० प्रवाशी रोज शहरात येत आहेत. यापैकी एकही प्रवाशाची येथे आरोग्य तपासणी होत नाही. तसेच त्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठी सुध्दा कोणीही आरोग्य विभागाचा कर्मचारी येथे उपलब्ध नसतो. या तिन्ही गाड्या रात्री १० : ३० ते पहाटे ५ : ३० वा दरम्यान दौंड रेल्वे स्थानकात येतात. यावेळी फक्त टिकीट तपासणीस आपली सेवा बजावीत असतात. रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, तसेच आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसतो. दौंड रेल्वे प्रशासनाचा हा निष्काळजीपणा दौंड शहरासाठी मात्र धोक्याची घंटा आहे. दौंड तहसिलदार, न पा चे मुख्याधिकारी, उप जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, यांना सुध्दा ही गंभीर बाब निदर्शनास आणुन दिलेली आहे. मात्र तरी सर्वांचाचे याकडे दुर्लक्ष आहे. हि खेदाची बाब आहे. दौंड रेल्वे स्थानकात उतरणाय्रा प्रवाशांची आरोग्य तपासणी करायची कोणी आणि प्रवाशांना होम क्वारंटाईन करावयाची जबाबदारी नेमकी कोणाची ? याचेच उत्तर कोणाकडे नाही.