एकाच दिवशी दोन उमद्या युवकांच्या ‛मृत्यू’ने ‛केडगाव’ स्तब्ध झाले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या केडगावमध्ये आज विविध घटनांत दोन युवकांचा मृत्यू झाल्याने केडगावकर शोकसागरात बुडाले आहेत.

पहिली घटना ही केडगाव येथे गेल्या 25-30 वर्षांपासून स्थायिक झालेल्या खामकर कुटुंबियांसोबत घडली असून ‛राम’ खामकर या अवघ्या 33 वर्षीय युवकाचा अल्पशा आजाराने बळी घेतला आहे. राम खामकर हा त्याचा भाऊ गणेश खामकर या सोबत चौफुला येथे श्रीनाथ गॅरेज चालवत होता. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या दोन्ही भावांनी कुठलाही आर्थिक आधार नसताना केवळ स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मोठे विश्व निर्माण केले होते. एका भाडोत्री जागेत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेले गॅरेज त्यांनी नंतर स्वकष्टाने स्वतःची जागा घेऊन मोठे बांधकाम करून युवकांसमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला होता. गणेश फिटर आणि राम फिटर अशा नावाने या दोन भावांची जोडी प्रसिद्ध होती. 

दुसरी घटना ही केडगाव-आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता योगेश निढाळकर या युवकाच्या मृत्यूची असून अवघ्या 38 व्या वर्षी या युवकाला किरकोळ अपघातामध्ये आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. योगेश निढाळकर या युवकाचा आंबेगाव ता. दौंड येथे केशकर्तनालयाचा व्यवसाय होता. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी विनम्र बोलणे आणि त्यांची विचारपूर करणे यात योगेश चा हातखंडा होता. इस्पितळात उपचार सुरू असताना आज त्याचीही प्राणज्योत मालवली.

केडगावच्या या दोन युवकांचे अचानक दुर्दैवी निधन झाल्याने केडगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.