दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंडच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घ काळाची कारकीर्द असलेले शहराचे माजी नगराध्यक्ष डॉ. राजाभाऊ उर्फ रंगनाथ कुलकर्णी यांचे आज सकाळी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
दौंड नगरीशी पाच दशकांचे दृढ नाते जुळलेले डॉ. कुलकर्णी हे मुळचे अंबेजोगाईचे. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर होऊन त्यांनी आपले काम प्रत्यक्ष युध्दभूमी वरूनच सुरू केले. बांगला देश मुक्ती संग्रामात त्यांनी आगरतळ्यात सेवा बजावली. पुढे राज्य राखीव पोलीस दलाच्या दौंड येथील कॅम्प मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर ते दौंडमध्येच स्थायिक झाले आणि त्यांनी सुसज्ज योगेश्वरी हॉस्पिटल उभारले.
वैद्यकीय व्यवसायासहच दौंडच्या सार्वजनिक जीवनातही ते अल्पावधीतच अग्रेसर झाले. सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर संघचालकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली मात्र राजीव गांधींच्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दौंड नगरपालिकेच्या निवडणूकीतल्या विजयानंतर नगराध्यक्षपदाची धुरा देखील काही वर्षे त्यांनी सांभाळली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय व शिशुविकास मंदिर या शैक्षणिक संस्थांशीही ते संबंधित होते. ‘रचना’ या सांस्कृतिक संस्थेच्या स्थापनेत त्यांनीच पुढाकार घेतला होता, ‘संगीत मंडळा’ची सुत्रेही त्यांच्याच हाती होती.
राजाभाऊंच्या जाण्याने सर्वच स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. शहरावर या घटनेची शोककळा पसरल्याचे चित्र आहे.