दौंड’मध्ये मुस्लिम बांधवांनी केले गणेश मंडळांचे स्वागत, शहरातील हिंदू -मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम



दौंड : शहरातील हिंदू- मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम राखीत दौंड मधील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या मंडळांचे हार नारळ देत स्वागत केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दरवर्षी मुस्लिम समाजाच्या वतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येते, मुस्लिम बांधवांनी यावर्षीही हीच परंपरा कायम करीत भाई चाऱ्याचे दर्शन घडविले. शाही आलमगीर मशिदीचे मुख्य विश्वस्त युसुफ इनामदार, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, मा.नगरसेवक इस्माईल शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, नगरसेवक वसीम शेख,मन्नान इनामदार,उबेद खान, जावेद सय्यद, अल्ताफ सय्यद, मोहसिन शेख आदींनी सदरचा उपक्रम राबविला.कोरोना च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला गणेशोत्सव गणेश मंडळांनी आपल्या भावनांना मुरड घालीत अत्यंत साधेपणाने परंतु उत्साहात साजरा केला. 

त्याच प्रमाणे गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत बाप्पांचे विसर्जनही अत्यंत शांततेत पार पाडले.पो. निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.