दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून जवानांनी दिलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे व वाईट व्यसनांपासून दूर राहुन नियमित व्यायाम करण्याचा सल्ला राज्य राखी पोलीस बल, पुणे परिक्षेत्र चे उप महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी जवानांना दिला.
राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र (नानवीज, दौंड) या ठिकाणी नवप्रविष्ठ पोलीस शिपाई मुलभुत प्रशिक्षण सत्र नं. ६१ च्या दिक्षांत संचलन सोहळ्या वेळी बोलत होते. राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीजच्या निसर्गरम्य वातावरणात सोहळा अतिशय उत्साहीपणे पार पाडला.
राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंडचे प्राचार्य रोहिदास पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. स्वत: च्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांनी तणावमुक्त जीवन जगले पाहिजे यासाठी दररोज व्यायाम, योगासन आणि प्रार्थना या तीन बाबी सध्याच्या काळात अतिशय महत्वाच्या आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
या दिक्षांत संचलनाचे नेतृत्व पोलीस शिपाई गणेश शहाजी कणसे यांनी केले. या
कालावधीत जवानांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या जवानांना
पोलीस उपमहानिरिक्षक यांच्या हस्ते विविध पारितोषिके देण्यात आली, यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानांकित बॅटन आकाश सुरवाडे यांनी पोलीस उपमहानिरिक्षक यांचे हस्ते स्विकारले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस नाईक बसवराज परगोंडे यांनी केले. सदर दिक्षांत
संचलन कार्यक्रमासाठी रा. रा. पो.बल गट सात चे समादेशक श्रीकांत पाठक, रारापो बल गट पाच चे समादेशक तानाजी चिखले, पोलीस प्रशिक्षण केंद्र
नानवीज चे प्राचार्य संदिप आटोळे
तसेच सहा. समादेशक, मधुकर सातपुते, दिलीप खेडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य कैलास न्यायनीत यांनी केले.