मुंबई : सहकारनामा ऑनलाइन.
– शेतमालाचे बाजारभाव ठरवण्यासाठी आणि दूरगामी धोरण आखण्यासाठी शेतीमालाचे स्वतंत्र मंत्रालय उभारण्यात यावे अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड.राहुल कुल यांनी आज विधानसभेत केली.
यावेळी बोलताना आमदार अॅड.राहुल कुल म्हणाले कि नाशवंत मालाची काढणी, काढणी पश्चात हाताळणी, विक्री व्यवस्थेचा अभाव, विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची साखळी, शीतगृहांचा अभाव इत्यादी कारणांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकवलेल्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, उत्पादन खर्च व शेती मालाचा बाजार यामध्ये मोठ्या प्रमाणवर तफावत होत आहे.
निसर्गाचा प्रकोप तसेच असंतुलनामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. कृषी विभागाच्या माहिती आधारे आयात निर्यात धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. उत्पादनाची माहिती, शेतमालाचा बाजारभाव ठरवत असताना त्यामध्ये शासनाचा थेट हस्तक्षेप असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव ठरवण्यासाठी दूरगामी धोरण आखण्यासाठी शेतीमालाचे स्वतंत्र मंत्रालय उभारण्यात यावे अशी मागणी आमदार अॅड.राहुल कुल यांनी केली. याबाबत शासनाने कार्यवाही करावी असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.