पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा ‘किंगमेकर’… ‘राहुल कुल’

अब्बास शेख

पुणे : संग्राम थोपटे (भोर), कुणाल पाटील (धुळे) आणि प्रवीण माने (पुणे जिल्हा) यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) झालेल्या प्रवेशामागे दौंडचे आमदार राहुल कुल हे पडद्यामागील महत्त्वाचे सूत्रधार असल्याची चर्चा होत होती मात्र आता हे सिद्ध झाले आहे. राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात आणि पुणे जिल्ह्यात भाजपच्या विस्तारासाठी त्यांची रणनीती महत्त्वाची ठरते आहे.

संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ, पक्षाकडून दुर्लक्ष आणि विकासकामांसाठी मिळणारा पाठिंबा न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम करूनही काहीच मिळाले नाही, अशी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबाचा भोर मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे, पण 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांचे स्वागत करताना हा पक्षप्रवेश ग्रामीण भागातील पक्षाच्या बळवत्तेसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

कुणाल पाटील हे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले आहेत. त्यांनीही पक्षाकडून उत्तर महाराष्ट्रातील दुर्लक्ष, स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण न होणे आणि भविष्यातील राजकीय कारकीर्द यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशी ७५ वर्षांचा संबंध आहे, पण त्यांनी स्वेच्छेने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्ट केले.

प्रवीण माने यांच्या संदर्भात, त्यांनी आधी शरद पवार गटात काम केले, परंतु नंतर भाजप नेत्यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे इंदापूर आणि बारामती लोकसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढेल, असा अंदाज आहे.

मागील वर्षी विधान परिषद, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल कुल यांनी भाजपच्या यशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख पडद्यामागील रणनीतीकार म्हणून होत असून, पक्षांतर्गत आणि बाह्य राजकारणात त्यांची पकड वाढली आहे.

राहुल कुल यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील सुभाष कुल आणि आई रंजना कुल दोघेही दौंडचे आमदार होते. सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या राहुल कुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील विस्तार वेगाने झाला आहे.

राजकीय चर्चांमध्ये राहुल कुल यांना ‘पडद्यामागील किंगमेकर’ म्हटले जाते. त्यांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे आणि संवाद कौशल्यामुळे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात नवे बळ आले आहे. पक्षाच्या विस्तारासाठी राहुल कुल यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.