राजकीय स्वार्थासाठी भीमा पाटस कारखाना पुन्हा बंद पाडण्याची मोठी खटपट..? कारखाना वाचवून तो चांगला चालला हे कुणाच्या डोळ्यात खुपतंय..?

दौंड : मागील काळात उसाचा दर आणि साखर विक्रीचा दर यांच्यामध्ये किंमती फिक्स नसल्यामुळे राज्यातील अनेक कारखाने डबघाईला आले होते. यातून राज्यातील कारखाने सावरण्यासाठी कोजन, डिस्टलरी असे विविध प्रयोग सुद्धा राबविण्यात आले होते. मात्र तरीही पुणे जिल्ह्यातील अनेक कारखाने कर्जबाजारी होऊन बंदच पडले ते अजूनही चालू होताना दिसत नाहित.

असाच काहीसा प्रसंग भीमा सहकारी साखर कारखान्यावर आला होता मात्र आपल्या कौशल्याने हा कारखाना वाचविण्यात आणि तो सभासदांच्या मालकीचा ठेवण्यात या कारखान्याचे चेअरमन राहूल कुल यांना यश आले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र हा कारखाना सुरु झाल्याने चेअरमन आणि संचालक मंडळावर असणारी नाराजी दूर होऊन ती आनंदात बदलत असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यात हा आनंद खुपू लागला आहे. त्यामुळे हा कारखाना या ना त्या कारणाने पुन्हा बंद कसा पडेल असा प्रयत्न केला जात असून त्यासाठी विविध प्रयोग केले जात असल्याची भीती ऊस उत्पादक शेतकरी आणि काही कामगार बोलून दाखवू लागले आहेत.

ज्यांनी हा कारखाना लिलावात काढण्याची तयारी केली होती त्यांना यात यश आले नाही त्यामुळे आता कोणत्या ना कोणत्या कारणाने कारखाना हा विषय चघळत ठेऊन येथे असे काहीतरी व्हावे अण हा कारखाना पुन्हा बंद पडावा असा डाव काहींनी आखला असल्याचा संशय आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. कारखाना बंद पडला तर याचे खापर चेअरमन आणि संचालक मंडळावर फोडता येईल आणि मग आपल्याला यावर राजकारण करता येईन असाही काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप आता ऊस उत्पादक शेतकरी करू लागले असून केवळ राजकीय स्वार्थासाठी कुणीही ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या पोटावर पाय देऊ नये अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

अनेक मोठ्या अडचणीतून मार्ग काढून हा कारखाना वाचला आहे. तालुक्याच्या आसपासचे कारखाने धुळखात पडून असताना हा कारखाना मात्र रुबाबात आणि जोमाने सुरु आहे. जे विरोधक या कारखान्याबाबत राजकारण करू पाहत आहेत त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेते मंडळींचे असणारे सहकारी कारखाने पहावेत. त्याची सध्याची अवस्था पहावी आणि ते का बंद पडले आणि आपल्या नेत्यांनी ते कारखाने पुन्हा सुरु का केले नाहित याचा अगोदर जाब विचारावा आणि नंतरच चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या भीमा पाटस कारखान्याबाबत बोलावे असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित करत आहेत.

अतिशय बिकट परिस्थिती असताना सुद्धा हा कारखाना सुरु होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असल्याचे दिसत आहे.त्यामुळे हा कारखाना या ना त्या कारणाने बंद पाडण्यासाठी नेमकं कोण राजकारण करत आहे आणि कुणाच्या डोळ्यात हा सुरु असलेला कारखाना खूपत आहे हे आता शेतकरी आणि कामगारांपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे आपल्यात कोणती गोष्ट करण्याची दानत नाही अण दुसरं करतंय तर त्याला करू द्यायचं नाही असा काहीसा प्रकार येथे घडत असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत.