दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे 2 युवकांवर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार केल्याची गंभीर घटना घडली आहे. जखमी युवकांना केडगाव येथील मोहन जनरल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार केडगाव येथील एका बिल्डिंग मध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये हर्षद गायकवाड आणि राहुल गायकवाड यांच्यावर 5 ते 6 जणांनी कोयता आणि तलवारी सारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात दोन्ही युवक जबर जखमी झाले असून या हल्ल्यातील एका हल्लेखोराला या दोन्ही जखमी युवकांनी ओळखले आहे. सलमान राजे असे त्या हल्लेखोराचे नाव असल्याची माहिती या जखमी युवकांकडून प्राप्त होत आहे.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अजून समजू शकले नसून यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. याठिकाणी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनीही भेट दिली असून यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.