दौंड मधील गांधी चौकात रोहित्राला मोठी आग | छोट्या विक्रेत्यांचा माल जळाला

अख्तर काझी

दौंड : शहरातील मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकात महावितरण कंपनीच्या रोहित्राचा मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. स्फोट झाल्याने त्या मधील तेल सर्वत्र उडाले त्यामुळे आग इतरत्र पसरली. घटना अगदी सकाळी घडल्याने सुदैवाने रस्त्यावर वर्दळ कमी होती त्यामुळे अप्रिय घटना घडली नाही.

हे रोहित्र 2-3 दिवसापूर्वीच नव्याने बदलण्यात आले आहे त्यामुळे या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनेमुळे रोहित्राच्या खाली मोकळ्या जागेत पूजेचे साहित्य, बांगडी विक्री चे दुकान मांडणाऱ्या विक्रेत्याचे नुकसान झाले. आगीमध्ये पूजेचे साहित्य व इतर माल जळून खाक झाला. प्रसंगावधान दाखविल्याने अप्रिय घटना टळली. वास्तविक पाहता गांधी चौकातील या रोहित्राची जागा बदलण्यात यावी अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी महावितरण कंपनीकडे केलेली आहे व जागा बदलण्याचे महावितरण ने आश्वासनही दिलेले आहे.

आला ड्रोन चा कर्दनकाळ

मात्र आता पुन्हा ही याच जागेवर रोहित्र बसविण्यात आले आहे. ज्या पर्यायी ठिकाणी हे रोहित्र हलवायचे आहे त्या ठिकाणी रोहित्र बसविण्यासाठी आवश्यक असणारे बांधकामही( चौथरा) पूर्ण झालेले आहे. मात्र या रोहित्राची जागा बदलण्यासाठी महावितरणला मुहूर्त सापडत नाही. महावितरण एखाद्या मोठ्या अप्रिय घटनेची वाट पहात आहे का? असा सवाल येथील व्यापारी वर्ग उपस्थित करीत आहेत.

गांधी चौकातील रोहित्राला आग लागली असल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेचा अग्निशमन बंब दुरुस्तीसाठी पाठविला असल्याने त्यांनी दौंड शुगर व दौंड एमआयडीसी विभागाशी संपर्क साधून त्यांचे अग्निशमन बंब बोलावून घेतले परंतु त्यामुळे आग विझविण्यास मोठा विलंब झाला. या घटनेनंतर तरी महावितरण ने हे रोहित्र अन्यत्र हलवावे व भविष्यात होणारी अप्रिय घटना टाळावी अशी मागणी येथील व्यापाऱ्यांकडून होत आहे.