अख्तर काझी
दौंड : दौंड रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र याच दलाच्या काही जवानांचे रेल्वेच्या डिझेल चोरीत हात असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिसांच्या रेल्वे हद्दीमध्ये मोठी डिझेल चोरी झाली आहे आणि या डिझेल चोरी प्रकरणात दौंड आरपीएफ च्या 2 जवानांचा समावेश असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे असताना दौंड रेल्वे सुरक्षा दल कार्यालयाकडून या डिझेल चोरीची व अटक आरोपींची माहिती पत्रकारांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
सदर डिझेल चोरी प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने जर एवढी मोठी आणि चांगली कामगिरी केली असताना ती माहिती पत्रकारांना का दिली जात नाही याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर सर्वत्र उलट सुलट चर्चा होत आहे. या डिझेल चोरी प्रकरणाची माहिती पत्रकारांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली असता, काही पत्रकारांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेत त्यांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे थोडे थांबा असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेले काही आरोपी आता जामिनावर सुटलेही आहेत अशी माहिती मिळत असताना अद्याप पोलिसांकडून पत्रकारांना कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिसांच्या या भूमिकेकडे संशयी नजरेने पाहिले जात आहे. दौंड ग्रामीण पोलीस, लोहमार्ग पोलीस त्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या अपघातांची तसेच विविध घटनांची माहिती देताना पत्रकारांची कधीच अडवणूक करीत नाहीत. मात्र येथील सुरक्षा दल, रेल्वेच्या डिझेल चोरी सारख्या गंभीर घटनेची माहिती लपविण्याचा का प्रयत्न करीत आहेत असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित केला जात आहे.
ज्या रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करायचे आहे त्याच दलाच्या जवानांचे यात हात असल्याचे समोर येत आहे. या चोरी प्रकरणाची माहिती पत्रकारांना का दिली जात नाही अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.