पुण्यातील नवले पुलावर भिषण अपघात, 8 जणांचा मृत्यू.. पेटलेल्या वाहनांतील मृतदेह पाहून पुणेकर हादरले

पुणे : पुण्यातील नवले पुलावर आज सायंकाळी 5:15 च्या आसपास भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका ट्रक ने समोरील वाहनांना धडक दिल्याने समोरील वाहने एक दुसऱ्याला धडकून भिषण आग लागली. या अपघातात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 जण गंभीर जखमी झाल्याची माहितीतेथील उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे.

पुणे शहरातील नवले पुलावर झालेल्या अपघाताची दृश्ये समोर आली असून यावरून यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाताच्या घटनेचा एक व्हिडिओहि समोर आला असून यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांचे मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून सांगितली जात आहे.

तर यात अजूनही काहीजण अपघात झालेल्या वाहनांमध्ये अडकून पडल्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून या वाहनांना आग लागल्याने या लोकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची त्यांनी पुष्टी केली असून 25 ते 30 जण किरकोळ, गंभीर जखमी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार एका ट्रक चे ब्रेक फेल झाले त्यामुळे त्याने समोर असलेल्या कार आणि कंटेनरला धडक दिली. यात कार ने पेट घेतला त्यानंतर या ट्रकनेहि पेट घेतला. यात ड्रायव्हरचा आणि इतरांचा मृत्यू झाला. इतर वाहनांनाहि आग लागली. या भिषण अपघातानंतर कंटनेरच्या मध्ये जी कार अडकली होती ती क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु होते. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त करताना,  पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो असे म्हटले आहे.