Daund |भीमा नदी पात्र झाले कोरडे, शेतकऱ्यांची पिके आली धोक्यात

राहुल अवचर

देऊळगावराजे (दौंड) : 30 मे 2023 दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शिरापुर येथील भीमा नदी कोरडी पडली असून त्यामुळे रब्बी हंगामातील आणि इतर पिके धोक्यात आली आहेत. भीमानदी कोरडी पडल्यामुळे आता येणाऱ्या हंगामातील पिकांची लागवड शेतकऱ्यांनी थांबवली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

उन्हाचा तडाखा जोरात असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. पण नदीला पाणी नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून कपाशी आणि ऊस लागवडीसाठी सऱ्या काढून ठेवलेल्या आहेत. पण नदीला पाणी नसल्यामुळे या पिकांच्या लागवडी खोळंबल्या आहेत कारण नदी पाणी नसल्यामुळे नदीकडच्या विहिरींनाही पाणी कमी झाले आहे. त्यामुळे वरील धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी समस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस जरी झाला असला तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे जर चालू वर्षी पाऊस कमी झाला तर येणाऱ्या हंगामातील पिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शिरापूर येथे बंधारा किंवा कुठल्याही प्रकारची पाणी अडवण्यासाठी भिंत नसल्यामुळे येथील नदीपात्र लवकर कोरडे पडत आहे त्यामुळे तातडीने भीमा नदीत भामा आसखेड या धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शिरापुरचे माजी सरपंच केशव काळे यांनी केली आहे.