Bharat Band : देशात भारत बंदची हाक, मात्र केडगाव बाजारपेठेवर कुठलाही परिणाम नाही



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

संपूर्ण देशभरात विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला दौंड तालुक्यात मात्र हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी केडगाव बाजारपेठेवर या बंदचा कुठलाही परिणाम जाणवत नसून दैनंदिन व्यवहार आणि जन जीवन सुरळीत सुरू आहे. आज मंगळवारी केडगावचा आठवडे बाजार असतो तो आज सुरू राहणार की बंद राहणार याबाबत सकाळी शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आजचा आठवडे बाजार नेहमी प्रमाणे सुरू होऊन मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला माल विकण्यासाठी आले आहेत तर हा माल विकत घेण्यासाठी नागरिकही गर्दी आहेत.

आजचा बंद हा केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी असून देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नागरिकांचाही जाहीर पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. 

जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांसह विविध संघटनांनी आजच्या भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.