अब्बास शेख
केडगाव (दौंड) : केडगाव (ता. दौंड) येथील जुन्या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे भगवान (तात्या) सोपाना जगताप यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले ते 85 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी हौसाबाई, शिवाजी, सुदाम, बापू ही मुले आणि संध्या, आशा, मंगल या विवाहित 3 मुली आणि नातू, पनतू असा मोठा परिवार आहे. कोणतेही शुल्क न घेता सामाजिक बांधिलकीतून असाध्य व्याधिंवर उपचार करणारे जुन्या पिढीतील वैद्य, कायम शांत, सय्यमी आणि मितभाषी स्वभाव ही तात्यांची एक वेगळीच ओळख होती.
भगवान तात्या म्हणजे जुन्या पिढीतील पैसे न घेता ईलाज करणारे डॉक्टरच.. केडगाव पंचक्रोशीमध्ये भगवान तात्या यांचे नाव मानवी शरीरातील दुखनी आणि आजार दूर करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी मानवी शरीरात अचानक उद्भवणारी चमक, शरीरातील अकड, मुरगळा, हाड मोडणे, पाय मुरगळने या व्याधीवर ईलाज करणारी विद्या आत्मसात केली होती. केडगाव परिसरामध्ये कुणाला अशी व्याधी झाली तर सर्वात अगोदर भगवान तात्यांना बोलावले जायचे. ते स्वतः लोकांकडे जाऊन ईलाज तर करायचेच मात्र त्या इलाजाचा एक रुपायाही कधी घेत नसत. त्यांच्या या सामाजिक कार्याने अनेकजण भारावून जायचे.
नागरिकच काय डॉक्टरही ईलाज करायला यायचे.. भगवान तात्या जगताप यांच्या विद्येची परिसरात मोठी चर्चा होती. त्यांनी हजारो लोकांना असाध्य व्याधीतून बरे केले होते. त्यामुळे नागरिकांसह कधी कधी असाध्य व्याधीने पिडीत असणारे डॉक्टर सुद्धा त्यांच्याकडे येऊन ईलाज करून घ्यायचे अनेक सुया टोचून जे दुखणे बरे झाले नाही ते तात्यांच्या उपचाराने बरे झाल्याचे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित व्हायचे.
कधीही भरून न निघणारी उणीव.. जुन्या पिढीतील अनमोल तारा भगवान (तात्या) जगताप यांच्या निधनाने केडगाव गावठाणावर शोककळा पसरली आहे. तात्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी उणीव निर्माण झाली आहे.