दौंड : शहरातील वर्दळीच्या शालिमार चौक परिसरातील एका घरातून चोरट्याने भर दिवसा 1 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची घटना उघडकीस आली. भर दिवसा घरफोडी झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी मंदाकिनी प्रताप चव्हाण (वय 70,रा. म्हसोबा मंदिर, शालिमार चौक दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना दि. 13 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 2.30 वा. च्या दरम्यान येथील शालिमार चौक परिसरात घडली. फिर्यादी दि. 13 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता घराला कडी लावून आपल्या नातलग महिलेसोबत जवळच असलेल्या सराफ पेढीमध्ये खरेदीसाठी गेलेल्या होत्या. त्या दुपारी 2:30 वाजता घरी परत आल्या असता त्यांना घरातील कपाट उघडे दिसले.
संशय आल्याने त्यांनी कपाटातील कप्प्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आहेत का हे पाहिले, त्यावेळी कपाटातील कप्प्यात असलेले दागिने (सोन्याची चैन 75 हजार रुपये, अंगठी 25 हजार रुपये) मिळाले नाहीत. म्हणून त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील दागिने चोरून नेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार ढुके करीत आहेत.
दि.7 जानेवारी रोजी दौंड शहरातील खाटीक गल्ली येथील घरातून महिलेचे 62 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे तसेच दिनांक 15 जानेवारी रोजी गाडे वाडी, बोरीबेल येथील शेतकरी कुटुंबाच्या घरातून 10 लाख 32 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत. शहर व ग्रामीण भागात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.