अख्तर काझी
दौंड : मर्डर झाला आहे, तपासणी चालू आहे, पुढे पोलीस नाकाबंदी चालू आहे आपले दागिने काढून ठेवा, आम्ही चोर पकडला आहे त्याने चोरी केलेले दागिने तुम्ही परिधान केलेल्या दागिन्यांसारखेच आहेत असे सांगून सध्या तोतया पोलीस सामान्य नागरिकांच्या मौल्यवान ऐवजांवर डल्ला मारीत आहेत.
खरे पोलीस असा कोणताही प्रकार करीत नाहीत, असे करण्यास कधीही सांगत नाहीत त्यामुळे जर का कोणी व्यक्ती असा प्रकार करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर घाबरून न जाता 112 (पोलीस नियंत्रण कक्ष) या क्रमांकावर पोलिसांशी तत्काळ संपर्क करावा, तसेच अशा चोरट्यांपासून सतर्क रहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दौंडकरांना केले आहे.
सध्या चोऱ्या करण्यासाठी चोरटे नवीन नवीन शक्कल लढवीत सामान्य नागरिकांना विशेषतः वृद्धांना हेरून लुटत आहेत. अशा बोगस पोलिसांच्या सांगण्याला घाबरून सामान्य नागरिक आपला मौल्यवान ऐवज त्यांच्या स्वाधीन करीत असल्याच्या घटना वारंवारपणे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा चोरट्यांपासून सावधान रहावे असे आवाहन गोपाळ पवार यांनी केले आहे.