दौंड : जर तुम्ही जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही हॉटेलमध्ये वाहन घेऊन जेवायला जात असाल तर तुम्हाला आता काही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण जर तुम्ही चारचाकी वाहन घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जात आहात आणि त्या गाडीमध्ये आपले किंमती सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा आणि आपल्या वाहनांमध्ये कोणत्याही किंमती वस्तू अजिबात ठेवू नका. कारण एकाच दिवशी तब्बल तीन ते चार ठिकाणी हॉटेल समोर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा चोरट्यांनी फोडून त्यातील किंमती ऐवज लंपास केले आहेत.
या ठिकाणी घडल्या आहेत चोरीच्या घटना… दौंड तालुक्यातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या हॉटेल ‘निर्माण’ (वाखारी) हॉटेल S4G, (वाखारी) हॉटेल ‘अगत्य’ (वरवंड) या ठिकाणी जेवण करण्याकरिता थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून किंमती ऐवज चोरण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींनी फिर्याद दिली आहे.
हॉटेल समोर पार्क केलेल्या वाहनांतून मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रे गेली चोरीला… मिळालेल्या माहितीनुसार पहिली घटना पुणे सोलापूर हायवेवर असणाऱ्या हॉटेल निर्माण (वाखारी) येथे जेवण करण्यासाठी थांबलेल्या अक्षय बाळासाहेब तावरे यांच्या सोबत घडली असून त्यांच्या गाडीची काच अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील मोबाईल, पर्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, कागद पत्रे, रोख रक्कम असा 19 हजार रुपयांचा ऐवजी चोरून नेला आहे, दुसरी घटना वाखारी येथे नव्याने सुरु झालेल्या S4G (एस फोर जी) या हॉटेल सामोर असणाऱ्या पार्किंगमध्ये घडली असून राजकुमार तुकाराम रेडे पाटील हे हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना त्यांच्या वाहणाची काच अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील 40 हजार रुपयांचा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप आणि इतर कागदपत्रे चोरून नेली तर तिसरी घटना ही वरवंड परिसरात घडली असून तेथे असणाऱ्या हॉटेल अगत्य समोर वाहन पार्क करून जेवायला गेलेल्या शेखर कुंडलिक दिवेकर यांच्या वाहणाची काच अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील लॅपटॉप, वन प्लस मोबाईल आणि कागदपत्रे असा 41 हजार रुपयांचा ऐवजी चोरून नेला आहे.
वरील घटना दि.8 ऑक्टोबर रोजी रात्री च्या सुमारास घडल्या आहेत. एकाच दिवशी एक ते दीड तासाच्या अवधीमध्ये या घटना घडल्या असल्याने या घटनांमधील चोरटे हे एकच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.