बारामतीच्या राधिका ने अटकेपार रोवला झेंडा | ‘इंटीग्रेटेड हेल्थ रिसर्च’ पुरस्काराने सन्मानित, अजितदादांनीही दिल्या शुभेच्छा

पुणे : आज विविध क्षेत्रांमध्ये महिला, युवती पुढे असल्याचे दिसत आहे. शाळांमधेही पहिल्या, दुसऱ्या नंबरवर मुली बाजी मारत असल्याचे आपण पाहत आलो आहोत. आता ग्रामीण भागातील युवतीही यात मागे नसून त्यांना जर संधी दिली गेली तर त्या नक्कीच संधीचं सोन करून दाखवतात हे पुन्हा एकदा बारामतीच्या राधिका शाह (वाघोलीकर) या युवतीच्या रूपाने सिद्ध झालं आहे.

बारामतीची सुपुत्री राधिका शाह हिला इटलीमध्ये पार पडलेल्या २६ व्या जागतिक काँग्रेस ऑफ ओबेसिटी सर्जरी परिषदेत युवा पिढीतील लठ्ठपणावरील संशोधनासाठी ‘इंटीग्रेटेड हेल्थ रिसर्च’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तिचं विविध मान्यवरांनी अभिनंदन केलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तिचं अभिनंदन केलं आहे. आणि लठ्ठपणा, मधुमेह आणि पोषण या क्षेत्रातील राधिकाचं काम उल्लेखनीय आहे, त्यासाठी तिचं कौतुक.

लठ्ठपणाशी निगडित तिच्या शोधनिबंधाचा पहिल्या तीनमध्ये समावेश करण्यात आला आणि या जागतिक स्तरावरील परिषदेत आपण केलेल्या संशोधनाच्या सादरीकरणाची संधी तिला मिळाली. राधिकाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तिला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा! अश्या पद्धतीने त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुलींना त्यांच्या निवडीचे शिक्षण दिल्यास त्या काय करू शकतात हे राधिकाच्या रूपाने सिद्ध झाले आहे.