bad road in city – नगरसेवकांप्रमाणेच दौंड च्या रस्त्यावरील खड्यांनीही दुरुस्ती विना पूर्ण केला 5 पाच वर्षाचा कार्यकाल! कुरकुंभ मोरी ते गोल राऊंड रस्त्याची दयनीय अवस्था



दौंड : शहर प्रतिनिधी

रस्त्यावरचा एक खड्डा बुजवायला तुम्हाला कलेक्टरच्या घ्याव्या लागतात दहा सह्या…. मुळशी पॅटर्न चित्रपटातील हा डायलॉग दौंड मध्ये लागू होत आहे. शहरातील कुरकुंभ मोरी ते शहीद भगतसिंग चौक (गोल राऊंड) मार्गावरील रस्त्यावर ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता जीवघेणा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शालिमार चौक, सिटी प्राईड बिल्डिंग, पिरॅमिड हॉस्पिटल (अहिल्याबाई होळकर, सहकार चौक) परिसरातील रस्त्यांची तर अक्षरशः  चाळण झाली आहे.



या रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झाली असताना या ठिकाणी नवीन रस्ता तर सोडाच साधे खड्डे  बुजवायची तसदी सुद्धा नगरपालिकेने किंवा संबंधित खात्याने घेतलेली नाही. नगरसेवकांचा 5 वर्षाचा कार्यकाल संपत आला आहे तसा येथील काही खड्ड्यांनी ही आपला चार ते पाच वर्षाचा कार्यकाल दुरुस्ती विनाच पूर्ण केला आहे. या  मार्गावरील बाजारपेठेत सकाळपासून सायंकाळपर्यंत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते तसेच या परिसरात 6-7 मोठी दवाखाने आहेत या दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठीच आहे, शहरातील न्यायालय व तहसील कार्यालयात जाण्यासाठी सुद्धा याच रस्त्याचा वापर केला जातो त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वाहतूक असते. 



या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना, विशेष करून महिला चालकांना या असंख्य खड्ड्यांतून आपली वाहने घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागताना दिसते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किंवा खड्डा चूकविताना समोरून येणाऱ्या वाहनांना धडकून या ठिकाणी अपघात होताना दिसतात. हे सर्व दिसत असताना नगरपालिकेला किंवा संबंधित खात्याला मात्र यातील काहीच दिसत नाही हे विशेष व दौंडकर नागरिकांचे दुर्दैव. नवीन रस्ता नका का करेना किमान रस्त्याची दुरुस्ती तरी करावी अशी मागणी येथील व्यापारी, नागरिक करीत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्या अगोदर येथील खड्डे तरी बुजवावीत अशा प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काहींनी घेतले ही असतील पैसे, असतील त्यांच्या काही समस्या, अडचणी म्हणून त्याची सजा सर्वांनाच हे नाही हो अपेक्षित.