पुणे : दौंड तालुका सहकारी संस्थेचा केडगांव उपलेखापरिक्षक रवींद्र गाडे याला लाच एका सोसायटीच्या सचिवाकडून लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलूचपत खात्याकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना तहसिलदार कचेरी, सासवड, पुणे या कार्यालयाचे समोर घडली.
यातील तक्रारदार हे एका विकास सेवा सहकारी सोसायटी चे सचिव आहेत. विविध कार्यकारी सोसायटी संस्थेमार्फत शेतक-यांना कर्ज देणे व कर्जाची वसुली करणे हे काम केले जाते. शेतक-यांकडून कर्जाची वसुली ५० टक्क्यापेक्षा जास्त असेल तर शासनाकडून (सहकार खाते) संस्थेस अनुदान मिळते. त्याकरीता तालुका ऑडीटरकडून लेखापरिक्षण करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव तक्रारदार यांनी लोकसेवक रविंद्र गाडे, तालुका ऑडीटर, केडगांव, दौंड, पुणे यांचेकडे दिला होता.
लोकसेवक रविंद्र गाडे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या संस्थेचा सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या दोन वर्षाचे सक्षमीकरणाचे प्रस्तावावरील शिफारसीकरीता १०,०००/- रुपयांची लाच मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक रविंद्र गाडे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या संस्थेचा सक्षमीकरणाचे प्रस्तावावरील शिफारसीकरीता ८,५००/- रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करुन, ८,५००/- रुपये (आठ हजार पाचशे रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. यानंतर लोकसेवक रविंद्र गाडे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ला. प्र. वि. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.