दौंड’मध्ये प्रसिद्ध डॉक्टर आणि कुटुंबावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल ! पत्नी व मुलीला जातिवाचक करत मारहाण, वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील प्रसिद्ध दंतचिकित्सक, डॉक्टर व त्याच्या कुटुंबीयाविरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीस व मुलीस जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात सदरचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

सदानंद आप्पा धुमाळ (रा. धुमाळ मेंशन, गोपाळवाडी रोड ,सरस्वती नगर दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून, रमेश सखाराम धुमाळ व वत्सला अप्पा धुमाळ असे इतर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. भावना चंद्रकांत गायकवाड( लग्नाआधीचे नाव) भावना सदानंद धुमाळ( लग्नानंतरचे नाव) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. दरम्यान सदरची घटना घडली. फिर्यादी यांना डॉक्टरने नऊ वर्षापासून आपल्याच घरामध्ये विभक्त ठेवले आहे. फिर्यादी व मुलगी त्याच घरातील दुसऱ्या जागेत एकत्र राहतात. दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. दरम्यान फिर्यादी त्यांची मुलगी व तिचा दिल्लीतील मित्र घरात असताना फिर्यादींचे पती तेथे आले व त्यांनी मुलीच्या मित्रास शिवीगाळ केली. त्यामुळे मुलीने त्यांना विचारले की तुम्ही कोणत्या अधिकाराने माझ्या मित्रास शिवीगाळ करीत आहात. याचा डॉक्टरला राग आला व त्यांनी मुलीसही शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही डॉक्टरने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली व तुझी लायकी आहे का या घरात राहण्याची असे म्हणत घरातून निघून जाण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादी यांचे दिर व सासूने सुद्धा फिर्यादी यांना मारहाण व शिवीगाळ केली.