Ashtavinayak road issue – लेखी आश्वासनानंतर अष्टविनायक मार्गाबाबत सुरू असलेले दौंड मधील ‛आमरण उपोषण’ स्थगित! तहसीलदार संजय पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 



|सहकारनामा|

दौंड : दौंड शहरातील अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी चौक मार्गावरील रस्ता मुळ आराखड्यानुसार न करता (11 मी.) अरुंद (7 मी.) केला जातो आहे, या मार्गावरील रस्त्याला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे न काढताच रस्त्याचे काम केले जाते आहे म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार, संजय जाधव, शाम सुंदर सोनोने यांनी प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात नगर परिषद कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. 

आज दि.28 जुलै रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार (प्रभारी मुख्याधिकारी) संजय पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत त्यांची भूमिका, मागणी समजून घेतली.  बैठकीत झालेल्या चर्चेत आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रस्त्याचे काम थांबविले जाईल व या मार्गावरील खाजगी अडथळे काढून रस्ता 11 मीटरचाच केला जाईल असे नगरपालिकेने लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते विक्रम पवार व सहकाऱ्यांनी  आंदोलन तुर्तास स्थगित केले.  

या वेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आप्पासो पवार, राष्ट्रवादीचे नगर पालिकेतील गटनेते बादशहा शेख, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सचिन कुलथे, भाजपाचे पदाधिकारी सुनील शर्मा तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व नगरपालिकेचे जिजाबा दिवेकर उपस्थित होते.