अब्बास शेख
दौंड : एक प्रचलित म्हण आहे मारनेवालेसे बचानेवाला बडा होता है, याचा प्रत्यय काल एका घटनेत आला असून आपला जीव वाचविणाऱ्याला फक्त मनुष्यच नव्हे तर प्राणी सुद्धा ओळखतात हे कालच्या या घटनेने सिद्ध झाले आहे.
ही घटना दौंड तालुक्यातील पाटस येथे घडली असून काल मंगळवार दि.२ मे रोजी सायं. ४:०० वाजण्याच्या सुमारास एक टाटा इंडिगो गाडीतून जर्शी गायींचे वासरू कत्तलीसाठी बारामतीच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती वरवंड येथील अहिरेश्वर जगताप यांना मिळाली. (ते पेशाने पत्रकार असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक गाई, वासरांचे जीव खटकांपासून वाचवले आहेत)
त्यांनी ही माहिती पाटस पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तात्काळ पाटस टोलनाका या ठिकाणी जाऊन टाटा इंडिगो गाडीस अडवून ती ताब्यात घेतली. या टाटा इंडिगो गाडीची पाहणी करत असताना गाडीमध्ये काळे व पांढऱ्या रंगाची असे एकूण १४ जर्शी गायीचे वासरु क्रूरपणे दाटीवाटीने कोंबून त्यांच्या पायाला नायलॉन दोरीने घट्ट बांधून त्यांच्या तोंडाला चिकट टेप लावल्याचे आढळून आले. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या चारा पाण्याची सोय केल्याचे दिसून आले नाही. गाडी चालकाकडे कसल्याही प्रकारचा वाहतूक परवाना ही मिळून आला नाही व जनावरांचे मेडिकल प्रमाणपत्र ही मिळाले नाही. तसेच या गाडीमध्ये कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारा एक धारदार सतुर मिळून आला. गाडीची तपासणी करत असताना अहिरेश्वर जगताप तेथे उपस्थित होते. त्यांना पाहून या मुक्या जनावरांच्या डोळ्यात एक वेगळी चमक जाणवत होती. जसे जगताप यांनी यातील जनावरांच्या तोंडाचा चिकट टेप काढला तशी ही जनावरे लहान मुलाप्रमाणे त्यांच्या गळयात पडून हंबरडा फोडताना दिसून आली.
पोलिसांनी सदर गाडी चालक कसायास ही जनावरे कुठे घेऊन चालला आहेस असे विचारणा केली असता, बारामती येथे त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे गाडी चालकाने सांगितले. याआधी देखील या गाडी चालक कसायावर यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 नुसार गुन्हा दाखल असून गाडीचालक आजतागायत फरार होता. पाटस पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन त्याच्या ताब्यात असणारी टाटा इंडिगो गाडी व त्यामध्ये असणारी वासरे असे एकूण २ लाख ८ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी आरोपी १) आबास इमाम शेख (वय २८ वर्षे रा.बारामती फलटण रोड गवारी फाटा ता.बारामती जि. पुणे) २) असिफ देसाई (रा. बारामती ता.बारामती जि.पुणे) यांचेवर पाटस पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर वासरांना सुखरूप चौफूला येथील बोरमलनाथ गोशाळेत सोडण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरामध्ये पो हवा.भानुदास बंडगर, पो ना.हनुमंत भगत, पो कॉ.समीर भालेराव, पो कॉ. गणेश मुटेकर, सोनबा देशमुख, पत्रकार अहिरेश्वर जगताप, विकास शेंडगे, सुरज जगताप यांनी विशेष सहकार्य केले. सदर घटनेचा पुढील अधिक तपास पो.ना.भगत हे करीत आहेत.
टीप- या बातमीतील विशेष लिखाण, शब्द रचना कुणीही कॉपीपेस्ट अथवा चोरी करून आपले वेबपोर्टल, वृत्तपत्रात छापू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.