भोर : काल पुणे जिल्ह्यातील एका हॉटेल उदघाटनावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेले वक्तव्य तालुक्यात चांगलेच गाजू लागले असून अनेकांनी अजितदादांचे हे वक्तव्य गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे.
काल भोर येथील पुणे बँगलोर महामार्गावर असणाऱ्या सारोळा येथे जगताप कुटुंबियांच्या पंचतारांकित हॉटेलचे उदघाटन विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांसह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अजित पवारांनी भाषणाच्या सुरुवातीला जगताप कुटुंबियांचे राजकारणातील योगदान आणि त्यांनी 1999 रोजी पक्षादेश मानून उमेदवारीतून घेतलेली माघार यावर भाष्य केले. तसेच भालचंद्र जगताप यांनी उमेदवारी माघारी घेऊन निवडणूक लढविण्यासाठी जे पैसे जमवले होते ते उमेदवारी न मिळाल्यामुळे या जागेत लावले आणि आज या जागेचे चीज झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
भाषणात पुढे त्यांनी माजी आमदार रमेश थोरात यांकडे पाहत, आप्पा राजकारणात काही खरं नाही, आपले यात केस न केस गेले त्यामुळे मला असं वाटतं की तुमचीही पुढील उमेदवारी नाकारतो म्हणजे तुम्ही तुमच्या पिढी करिता काहीतरी करून ठेवाल असे मिश्कीलपणे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राजकारणात कधी काय होईल याचा भरवसा नसतो. ज्यांना मदत केली, राजकीय क्षेत्रात लहानाचे मोठे केले ते कार्यकर्ते सुद्धा कधी धोका देऊन विरोधात जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या पुढील पिढीचा विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवावे असा संदेश अजित पवार यांनी उपस्थिती समुदायाला दिला आणि अनेक राजकीय पटलावरील व्यक्तींना आपल्या परिवाराची आठवणही करून दिली आहे. अजित पवारांनी रमेश थोरात यांचे नाव घेऊन जरी वरील वक्तव्य केले असले तरी त्यांचा इशारा मात्र इतरही इच्छूक उमेदवारांना होता असा अर्थ अनेकांनी काढला आहे.