पुणे : सहकारनामा ऑनलाइन
दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना फलटण जवळ घडली आहे.
या दरोडेखोरांनी सुमारे दोन महिन्यापूर्वी राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या वेशात येऊन सराफाच्या दुकानावर गोळीबार करत ते लुटले होते. दोन महिन्यानंतर या दरोडेखोरांचा आज सुगावा लागला होता. त्यामुळे त्या दरोडेखोरांना पकडण्यास पोलीस गेल्याने या दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही गोळीबार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वी राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलिसांच्या वेशात येऊन सराफाच्या दुकानावर गोळीबार केला होता. यातील आरोपी हे फलटण परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने आज पोलीस त्यांचा पाठलाग करताना फलटण जवळ वडले गावात वडगाव निंबाळकरचे एपीआय लांडे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले. मात्र त्याचवेळी दोन दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत ऊसाच्या शेतातून पसार झाले आहेत.
हि घटना समजल्यानंतर पोलीस दलासह नागरिकांमध्येही मोठी खळबळ माजली होती. नेमके काय झाले?? कुणी गोळीबार केला ?? का केला असेल ?? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
याबाबत आता खुद्द पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले सर्व पोलिस पथक सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही. फरार आरोपींचा शोध पुणे ग्रामीण आणि फलटण पोलीस घेत आहेत.अशी माहिती त्यांनी दिली आहे.