अख्तर काझी
दौंड : घरी निघालेल्या युवकाचा पाठलाग करीत त्याचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना दौंडमध्ये समोर आली आहे. युवकाच्या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन चारचाकी वाहनातून आलेले पाच संशयित फरार झाले असल्याची माहिती युवकाने दौंड पोलीस स्टेशनला दिली.
या प्रकरणी ओंकार रामकृष्ण तापकीर (वय 26,रा. हिंगणी बेर्डी, ता. दौंड) याने फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी 5 अनोळखी व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी युवक दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री 12 वा.च्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून हिंगणी बेर्डी येथील घरी निघाला होता. तो शिवाजी चौक रोडने जात असता गोवा गल्ली परिसरातील संभाजी स्तंभ येथे त्याची दुचाकी आली असता, त्याला त्या ठिकाणी पाच व्यक्ती उभ्या असलेल्या दिसल्या. ते सर्व फिर्यादी याच्याकडे व त्याच्या दुचाकीकडे एकटक पाहत होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर एकटाच असल्याने तो घाबरला व लागलीच त्याच शिरापूर रोडने तो पुढे निघाला.
त्यावेळी त्याच्या दुचाकी मागे एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी येत असल्याचे त्याने पाहिले. ही गाडी त्याचा पाठलाग करीत असल्याचा त्याला संशय आला. म्हणून खात्री करण्यासाठी युवकाने आपल्या दुचाकीचा वेग कमी केला जेणेकरून पाठीमागून येणारे सदरचे वाहन पुढे जाईल असे त्याला वाटले परंतु झाले मात्र उलट. सदरच्या चार चाकी वाहनाने त्याच्या दुचाकीस धडक दिली व ते वाहन पुढे निघून गेले. त्यावेळी युवकाने गाडीत पाहिले असता त्याला गाडीमध्ये पाच व्यक्ती बसलेल्या दिसल्या.
सदर गाडीचा नंबर पाहण्याचा त्याने प्रयत्नही केला परंतु त्याला केवळ MH-12 एवढाच नंबर दिसला. दरम्यान ती गाडी काही अंतरावर पुढे जाऊन थांबली. आपला धोका लक्षात घेऊन युवकाने खोरवडी गावातील मोरीतून दुचाकी नेली व मोरी च्या पलीकडे लावून तो उतरला. व त्या चार चाकी गाडीच्या दिशेकडे पाहत राहिला, तेव्हा ती गाडी सुद्धा मोरीच्या मागे काही अंतरावर थांबली. व त्यातून एक व्यक्ती खाली उतरली व चलो निकलो यहा से ,पीछे लो जल्दी से असे म्हणाली.
त्यामुळे युवक खोरवडी गावातच थोड्यावेळ थांबला व नंतर त्याने आपल्या मोबाईल मधून दौंड पोलिसांशी संपर्क करून सदरची हकीकत सांगितली. यावेळी दौंड पोलिसांची त्याला मदत झाली, पोलिसांनी युवकाला खोरवडी गावातून त्याच्या हिंगणी बेर्डी येथील घरी नेऊन सोडले. सदर घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.