अख्तर काझी
दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असल्याचे चित्र आहे. आमदार राहुल कुल विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात ही पारंपारिक लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे त्यांच्या प्रचारावरून दिसत आहे. दोन्ही गटाकडून आपले शक्ती प्रदर्शन दाखविण्यात येत आहे. आज शहरातील, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या दलित संघटना व पक्षांनी आमदार राहुल कुल यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शहरातील प्रमुख चौकातून रॅली काढीत शक्ती प्रदर्शन केले.
येथील संविधान स्तंभासमोर झालेल्या छोटेखानी प्रचार सभेत दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल कुल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले. राहुल कुल यांनी शहर व तालुक्यात केलेली भरीव विकास कामे, शहरातील बुद्ध विहारासाठी आणलेला कोट्यावधींचा निधी तसेच कोणताही जातिवाद न करता, कोणालाही त्याची जात न विचारता सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेत रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी, औषधोपचारासाठी केलेली मदत हे सर्व पाहून आम्ही सर्व दलित संघटनांनी त्यांना साथ देण्याचे व पुन्हा एकदा निवडून आणण्याचे ठरविले असल्याचे ते म्हणाले.
शहर व तालुक्यातील सर्व दलित समाजाने राहुल कुल यांना भरघोस मतदान करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. आरपीआय (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) भीम वॉरियर्स संघटना, लहुजी शक्ती सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तसेच दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, आज मला येथील दलित संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे, माझ्यावर विश्वास दाखविला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखविला मी सुद्धा तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून शहर व तालुक्यातील विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून तालुका सुजलाम, सुफलाम करणार असल्याचेही कुल म्हणाले. मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती राहुल कुल यांनी यावेळी दिली.
शहरातील चर्च ऑफ ख्राइस्ट, पेंटीकॉस्टल असेंबली चर्च तसेच डॅनियल बिलिवर्स असोसिएशन चर्च या तिन्ही चर्चमध्ये आमदार राहुल कुल यांच्या विजयासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. ख्रिश्चन समाजासाठीची आतापर्यंतची सर्वच कामे राहुल कुल नेहमी करीतच आले आहेत त्यामुळे आम्ही कूल यांना पाठिंबा देत आहोत असे ख्रिश्चन बांधवांनी यावेळी जाहीर केले. तिन्ही चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी राहुल कुल यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.