दौंड नगरपरिषद रणसंग्राम | नगराध्यक्ष पदासाठी आलेले सर्व 13 उमेदवारी अर्ज वैध

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामातील, उमेदवारी अर्ज दाखल करणे व नंतर अर्जाची छाननी या प्रक्रिया पार पडल्या आहेत. नगराध्यक्षपद ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव असून या पदासाठी एकूण 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेमध्ये सर्वच्या सर्व तेरा अर्ज वैध ठरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार कोमल बंड तसेच नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीच्या उमेदवार मोनाली वीर यांच्यामध्ये तिरंगी लढत रंगणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी योगिता सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र शहरातील इतर प्रभागांमध्ये या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी युती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज शिवसेना मागे घेईल असा अंदाज लावला जात आहे.

21 नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असल्याने यादरम्यान कोण कोण उमेदवार अर्ज माघारी घेतो याची उत्सुकता दौंडकरांना आहे. नगरसेवक पदासाठी एकूण 177 उमेदवारी अर्ज दाखल होते त्यापैकी छाननी मध्ये 27 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. उर्वरित उमेदवारांपैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात राहतो यासाठी 21 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आपल्या पक्षाला निवडणूक सोपी जावी तसेच हक्कांच्या मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अपक्ष उमेदवारांना भेटून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सर्वच प्रमुख पक्ष करीत असल्याचे दिसत आहे.