दौंडमध्ये शरद पवारांच्या ‘गुगलीवर’ अजित पवार यांचा भेदक ‘यॉर्कर’, कटारियांकडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचे संकेत

अख्तर काझी

दौंड : बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे या मतदारसंघात दोन दिग्गज पवारांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघातील आजपर्यंतची सर्वात जास्त अटीतटीची व लक्षवेधक लढत यावेळेस पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत व सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आणि यामुळेच साऱ्या देशाचे लक्ष पवार विरुद्ध पवार या लढतीकडे लागलेले आहे.

बारामतीच्या नावाला काळिमा फासणारी भयानक घटना


बारामती मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन शरद पवार आपल्या जुन्या सहकारी मित्रांची तसेच कट्टर विरोधकांचीही भेट घेऊन त्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच धर्तीवर अजित पवार सुद्धा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील दिग्गज असलेल्या नेत्यांची भेट घेऊन आपली रणनीती आखत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी दौंड शहर व तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी शहरातील त्यांचे जुने सहकारी, समर्थक, महायुतीचे आमदार राहुल कुल यांचे मार्गदर्शक, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. भाजपा आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शकाचीच पवार यांनी भेट घेतल्याने या भेटीची संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चा झाली. कूल यांच्या मार्गदर्शकाचीच भेट घेऊन शरद पवार यांनी टाकली गुगली….. विरोधकांच्या पोटात आला गोळा… अशा आशयाच्या बातम्याही त्यावेळी झळकल्या. परंतु यावर मात केली अजित पवार यांनी, अजित पवार यांनी दौंड शहराच्या दौऱ्यात प्रेमसुख कटारिया यांची भेट घेऊन, शरद पवार यांच्या गुगली विरोधात भेदक यॉर्करच टाकला आणि बंद दाराआड चर्चा न करता खुलेआम बैठकच घेतली.

यावेळी भाजपाचे आमदार राहुल कुल हेही पवार यांच्यासोबत होते. या बैठकीनंतर प्रेमसुख कटारिया यांनीही महायुतीचा म्हणजेच सुनेत्रा पवार यांचाच प्रचार करणार असल्याचे संकेत दिले. प्रेमसुख कटारिया म्हणाले की, शरद पवार आणि माझे फार जुने संबंध आहेत. त्यांच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांच्या सोबत होतो. पूर्वीपासूनचे संबंध आणि त्यांच्या मुलीच्या निवडणुकी संदर्भात त्यांनी माझी भेट घेणे हे काही विचित्र आहे असे वाटत नाही. शरद पवार थोर आहेत मी छोटा आहे, त्यामुळे त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा करणे इतका मी मोठा नाही. अजित पवार यांनीही त्यांच्या पत्नीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझी भेट घेतली यातही आश्चर्य वाटायला नको.

राजकारणापेक्षा माझ्या भागाचा विकास कसा होईल हे महत्त्वाचे, आमदार राहुल कुल यांच्यासोबत काम करताना फक्त शहर व तालुक्याचा विकास कसा करता येईल यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. या शहरातील दोन्हीही राजकीय गट एकत्र आल्याने दौंड शहर व तालुका सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी राहील असेही कटारिया म्हणाले. आणि त्यामुळे प्रेमसुख कटारिया कोणाचे काम करणार हा विषय आता निकाली निघाला आहे.