अजित पवारांचा मीडियाला ‛झटका’ ! अफवांच्या ब्रेकिंगमध्ये रमणाऱ्या ‛मीडियाला’ अजित पवारांचे ऑनलाईन ‛उत्तर’

अब्बास शेख

पुणे : कायम अजित पवारांवर निशाणा साधणाऱ्या मीडियाला आज अजित पवारांनी झटका दिला आहे. अजित पवारांबाबत शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या मीडियाला अजित पवारांनी ऑनलाईन उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियाने अजित पवारांबाबत एक संशयास्पद वातावरण तयार केले आहे. यात काही हालचाली संशयास्पद झाल्याही मात्र पवारांना आपल्या अँगल मधून लगेच गेस करणे वाटते तेवढे सोपे नाही.

आज झालेही असेच दिवसभर मीडियाने अजित पवारांबद्दल उलट सुलट बातम्या दाखवल्या आणि मीडियाला उत्तर देत बसण्यापेक्षा अजित पवारांनी आपली पोस्ट व्हायरल केली. ज्यामध्ये अजित पवार म्हणतात… ‛राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party – NCP) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे.

साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला. साहेबच अध्यक्षपदी कायम राहतील, हा निर्णय एकमतानं झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्ज्वल यश संपादन करेल.

आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत.

अजित पवारांनी दिलेल्या या मेसेजमधून आज दिवसभराच्या अफवांच्या वावटळी आणि संशयी बातम्यांचा भडिमार झेलणारे कार्यकर्ते मात्र जाम खुश झाल्याचे दिसत आहेत. कारण अजित पवारांबद्दल सुरू असलेली संशयी मोहीम सध्यातरी शांत झाली आहे. मरगळ आलेले कार्यकर्ते दोन-तीन दिवसांत पवारांच्या करिष्म्याने पुन्हा जोमाने कामाला लावले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीची तरुण फळी मात्र जोमाने कामाला लागेल यात शंका नाही.

टीप – वरील बातमी, शब्द रचना कुणीही कॉपीपेस्ट / चोरी करू नये. तसे कोणी आढळल्यास कॉपीराईट क्लेम तसेच बातमी, शब्दरचना चोरीची कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी