सहकारनामा : विशेष प्रतिनिधी
पुणे : 2019 साली राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आणि जवळपास राज्यात सर्वत्र अनपेक्षित असे निकाल लागले. पुणे जिल्ह्यातही भाजप चारीमुंड्या चित झाले, मात्र राष्ट्रवादीच्या दृष्टीने येथील एक निकाल अनपेक्षित असा होता आणि तो म्हणजे बारामतीच्या बांधावर असणाऱ्या आणि एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‛दौंड’चा.
कारण दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व परीने ताकद लावली होती. स्वतः राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते यांनीही दोन सभा दौंड तालुक्यात घेत स्वतः यात लक्ष घातले होते. परंतु तरीही येथे भाजप चे उमेदवार आणि विद्यमान आमदार राहुल कुल हे विजयी झाले. अजित दादा अनेक ठिकाणी आपल्या भाषणात पुणे जिल्ह्यात अपवाद वगळता राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार निवडून आले असे म्हणत असतात तसेच त्यांनी काल मावळ येथील सभेतही त्या अपवादाचा उल्लेख केला आणि रमेश थोरातांनी माझी सभा नाकारण्याची चूक केली नसती, तर आज निकाल वेगळा लागला असता हि सल भर सभेत बोलून दाखवली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना मी रमेश थोरातांना दौंड तालुक्यात माझी सभा घ्या असे म्हणलो होतो पण आप्पांनी मला आता पवार साहेबांची सभा झाल्यामुळे सर्वत्र चांगले वातावरण आहे, सभेची गरज नाही असे म्हणाले आणि 600-700 नी पडले. निवडणुकीला पडल्यानंतर मात्र दादा तुमची सभा घ्यायला हवी होती असे रमेश थोरात म्हणाले असा मिश्किल टोलाही अजित दादांनी यावेळी लगावला.
दौंड तालुक्यात हा विजय तसा सोपा नव्हता कारण राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात आणि भाजप उमेदवार राहुल कुल यांच्यात काटे की टक्कर झाली होती. गावगणीस निकाल पारडे बदलत होते. त्यामुळे शेवटी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रवादीच्या दृष्टीने अनपेक्षित असा निकाल लागून भाजप चे उमेदवार राहुल कुल यांचा 746 मतांनी विजय झाला होता. रमेश थोरात यांनी अजित पवारांची सभा नाकारण्याची केलेली चुक आणि त्याची किंमत रमेश थोरतांच्या पराभवाने चुकवावी लागलीच मात्र, बारामतीच्या बांधावरची जागा भाजपला गेली याची सल अजित पवारांना आजही आहे ती त्यांनी काल भर सभेत पुन्हा बोलून दाखवली.