ते रोज ‘बार’ काढायचे, अखेर दौंड पोलिसांनी एकदाच ‘बार’ काढला अण वातावरण शांत झाले

दौंड (अख्तर काझी) : कंपनीने दिलेले सायलेन्सर बदलून आपल्या बुलेटला गोळीबार झाल्या सारखे आवाजाचे कर्णकर्कश सायलेन्सर लावून शहरात बुलेट चे बार काढणाऱ्यांवर अखेर दौंड पोलिसांनी कारवाईचा बार काढताच दौंड शहरातील वातावरण शांत झाले. शहरातील वैतागलेल्या नागरिक व व्यापारी वर्गाने दौंड पोलिसांकडे याबाबत तक्रारही केली होती.

त्रस्त व्यापारी आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात अर्ज करत, शहरातील काही बुलेट धारकांनी आपल्या गाडीला गोळीबार झाल्यासारख्या आवाजाचे सायलेन्सर बसविले आहेत. शहरातून भरधाव धावणाऱ्या अशा गाड्यांच्या आवाजामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे, या बुलेट धारकांना मात्र त्याची मजा वाटत आहे. त्यामुळे अशा बुलेट धारकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

या तक्रारींची दखल घेत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी आपल्या पोलीस पथकाला अशा बुलेट धारकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे पोलीस पथकाने शहरात गस्त घालून येथील विविध भागातून कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेट ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्या, त्यांचे सायलेन्सर काढून ते नष्ट करण्यात आले व बुलेट मालकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच येथील नागरिकांना, व्यापारी वर्गाला त्रासदायक ठरणारे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर पुन्हा न वापरण्याची ताकीद देण्यात आली.

सर्वांनाच त्रासदायक ठरणाऱ्या बुलेट धारकांवर पोलिसांनी कारवाईचा बार काढल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कारवाई, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, सहाय्यक फौजदार रमेश साळुंके, पोलीस हवालदार नितीन बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल करमचंद बंडगर, अर्जुन नरळे, रमेश चितारे यांच्या पथकाने केली.