दौंड (अख्तर काझी) : कर्नाटक राज्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात जाऊन पोलिसांनी, खून प्रकरणात मागील दोन वर्षापासून फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले. हरिश्चंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे (वय 48,रा. कारले, गंगेची वाडी, ता. पेण, जिल्हा रायगड) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील सह आरोपी महिला लीला उर्फ रूपाली गणेश वाघमारे (रा. भुनेश्वर, ता. रोहा, जिल्हा रायगड) अद्याप फरार असून तिलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पेडगाव गावच्या हद्दीत एका शेतकऱ्याकडे कोळसा काम करणारे कामगार हरिश्चंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे व लीला उर्फ रूपाली गणेश वाघमारे यांनी दि. 4 मार्च 2023 ते 6 मार्च 2023 रोजी 5.30 च्या सुमारास त्यांच्यासोबत काम करणारा कामगार चंदर गणपत जाधव (वय 60,रा. वांद्रे ,मुळशी, जिल्हा पुणे) याचा अज्ञात कारणाने गंभीर मारहाण करीत खून केला आणि मृतदेह शेतातील उसाच्या पाचटा खाली लपवून दोघेही आरोपी पळून गेले.
याप्रकरणी दिलीप शंभू सांगळे(रा. दौंड) यांनी फिर्याद दिली होती, दौंड पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून हे दोघे फरार होते. दौंड पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असायचे परंतु कामाच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या गावांमध्ये जात असल्याने व एका ठिकाणी ते थांबत नसल्याने त्यांची ठिकाणे बदलत होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पथक पोहोचू शकत नव्हते. याआधीही दोन-तीनदा पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी गेले होते परंतु ते हाती लागले नाहीत मात्र यावेळेस दि. 23 जानेवारी 2025 रोजी पोलीस पथकाने आरोपीच्या ठिकाणाची परफेक्ट माहिती काढून, कर्नाटक राज्यातील बदामी येथून त्याला नियोजनबद्ध पद्धतीने जेरबंद केले. आरोपीकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीस दौंड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ( बारामती विभाग), दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पो. हवालदार किरण पांढरे, विनोद चव्हाण, किरण ढुके, पोलीस कॉन्स्टेबल संजय कोठावळे यांच्या पथकाने केली.