कोयत्याने मारहाण करून आठ महिने फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर : कोयत्याने मारहाण करून ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा निर्मलनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळताच कोतवाली पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. स्वामीनाथ अनिल सायंबर (वय २३, रा. गाडेकरचौक, निर्मलनगर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

रवि कचरु गोंधळी (वय २८ वर्षे, रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) यांना आरोपी स्वामीनाथ अनिल सायंबर व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून कोयत्याने मारहाण करून जखमी केले होते. रवि कचरु गोंधळी यांनी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून दि.१२ जानेवारी २०२३ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी स्वामीनाथ सायंबर फरार झाला होता.

आरोपी घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला निर्मलनगर येथून शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करत आहेत.

पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, रामनाथ हंडाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.