अख्तर काझी
दौंड : रेल्वे प्रवासासाठी शहरातून दौंड रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांना अडवून, त्यांना मारहाण करीत त्यांच्या किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला दौंड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. साहिम कलीम शेख (वय 19,रा. खाटीक गल्ली, दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.4 ऑक्टोबर रोजी संजय बाळू चव्हाण (वय 45,रा. पानशेत,ता. वेल्हे, पुणे) हे कुरकुंभ येथील फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन एसटीने दौंडला आले. येथील एसटी स्टँड वरून दुपारी 2 च्या दरम्यान ते दौंड रेल्वे स्टेशनला जात असताना एका चोरट्याने त्यांना, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत दगडाने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मारलेला दगड त्यांनी चुकविल्याने चव्हाण बचावले. परंतु चोरट्याने त्यांना धरले व मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील 1800 रु. व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेला. यानंतर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य समजून दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी गुन्हे शाखेच्या पथकास आरोपीचा त्वरित तपास करण्याच्या सूचना केल्या. पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून व गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता सदर घटनेतील आरोपी साहिम शेख असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी वडार गल्ली परिसरात मित्रांसोबत असल्याची माहितीही गुन्हे शोध पथकाने मिळवली. पथकाने परिसरात सापळा रचला व आरोपीस शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, निखिल जाधव तसेच पोलीस नाईक अमीर शेख यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अमीर शेख करीत आहेत.