मुंबई : सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यरोप सुरु आहेत. यात विरोधक म्हणतात आमच्याकडे (घोटाळ्याचे) खूप सारे बॉंब आहेत, त्याच्या वाती काढल्या असून फक्त ते पेटवायचे बाकी आहेत तर सत्ताधारी म्हणतात आमच्याकडे खरे (घोटाळे बाहेर काढणारे) बॉंब असून तुमच्याकडे साधे लवंगी फटाकेही नाहीत खरे बॉंब तर आमच्याकडे आणि ते आम्ही फोडणार असे म्हणत सत्ताधारी प्रति आव्हान देत आहेत.
त्यामुळे यांचे रोजचेच आरोप प्रत्यारोप पाहणारी जनता मात्र पुरती वैतागली असून तुमच्याकडे असणारे बाँम्ब आता एकदा फोडाच, आम्हालाही पाहू द्या की कोण किती पाण्यात आहे अशी इच्छा आता जनता व्यक्त करत आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष फक्त एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप, खालच्या दर्जाची विधाने आणि गोंधळ इतकेच काय ते जनतेला पहायला मिळत आहे. विविध विकासकामे, निधी यांबाबत चर्चा होऊन जनतेची कामे मार्गी लागतील असे लोकांना वाटत आहे.
मात्र विधानसभेतला रोजचा गोंधळ पाहून जनताही वैतागून गेली आहे. त्यामुळे आता एकदाच काय ते समोर आणा आणि नुसते आरोप करण्यापेक्षा एकदाच काय ते उघड होऊन जाऊ द्या. म्हणजे यातील दोषी हे जनतेच्या समोर येतील आणि तेच मग याचा जाब आपल्या नेतेमंडळींना विचारतील. त्यामुळे फक्त आरोप करु नका, एकदुसऱ्याला धमक्या देऊ नका तर जे काही आहे ते जनतेसमोर येऊ द्या अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.