दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला तब्बल सतरा दिवस उलटून गेले तरी अजूनही त्या अल्पवयीन मुलीचा कोणताच तपास लागत नसल्याने मुलीच्या नातेवाईकांकडून यवत आणि केडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
भेटायला ये नाहीतर तोंडावर अॅसिड फेकेन मिळत असलेल्या माहितीनुसार दि.17 मे रोजी या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ही मुलगी शालेय शिक्षण घेत होती. संशईत आरोपीने तिला भेटण्यासाठी तीच्या तोंडावर अॅसिड फेकून मारण्याची धमकी दिल्याची रेकॉर्डिंग मुलीच्या आई, वडिलांनी ऐकवली आहे. अश्याच प्रकारे तिला धमकावून तीचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप तिच्या आईने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. याबाबत त्या अल्पवयीन मुलीच्या आईने एक फोन रेकॉर्डिंग ऐकवली असून त्यामध्ये संबंधित संशईत आरोपी हा त्या मुलीला ‘तू मला आत्ता भेटायला ये, मी शाळेच्या बाहेर उभा आहे. जर तू मला भेटायला आली नाहीस तर मी तुझ्या तोंडावर ऍसिड फेकेन असे तो तिला धमकावत असल्याचे त्या रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला मिळत आहे.
ही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे मात्र पोलिसांचा तपास हा इतक्या संथ गतीने सुरु आहे की त्यांना या प्रकरणात कुणीतरी दबाव आणून त्यांना तपास करण्यापासून रोखत असल्याचा संशय मुलीच्या आई, वडिलांनी व्यक्त केला आहे.
त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन सतरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरीही यवत, केडगाव पोलिसांना याबाबतचा कोणताच धागादोरा सापडू नये यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुलीच्या आई, वडिलांनी पुणे पोलीस अधिक्षक आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याशीही पत्रव्यवहार केला असून पोलिसांच्या तपासावर आणि तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
‘मोका’ पाहून ‘शी’ करणाऱ्या गावपुढाऱ्याची दलाली!
या प्रकारणामध्ये ‘मोका’ पाहून ‘शी’ करणाऱ्या एका गावपुढाऱ्याची चमचागिरी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या नातेवाईकांना मदत करणे, आरोपीला विविध माध्यमातून संपर्क करून त्याला येथील संपूर्ण हालचाल, माहिती पुरवणे, पोलीस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे असले प्रकार हा गावपुढारी करत असल्याचे मुलीच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.