कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला दौंडजवळ 66 हजारांना लुटले

अख्तर काझी

दौंड : दहिवडी (जि.सातारा) गावातून दौंड मार्गे राजस्थानला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला अज्ञात 5 चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील 56 हजार रुपयांची रोकड व 10 हजार रुपयांचा मोबाईल लुटून नेला आहे. ही घटना दौंड हद्दीतील सोनवडी गावाजवळील रेल्वे पुलाजवळ घडली आहे. याबाबत सुभाषचंद्र मूलचंद यादव (रा.निमकताना,जि. सिकर, राजस्थान) यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा सहकारी कांद्याच्या गोण्या भरलेला ट्रक दहिवडीवरून राजस्थानला घेऊन जात होते. रात्री 1 च्या दरम्यान ट्रक दौंड-काष्टी मार्गावरील सोनवडी रेल्वे पुलाजवळ आला असता अंधाराचा फायदा घेऊन पाच जणांनी हा ट्रक अडवला. यावेळी चोरटे ट्रकच्या केबिनमध्ये चढले. त्यातील एकाने चालकाला चाकूचा धाक दाखवीत, मी खून करून आलो आहे तुझ्याकडे असेल ते काढून दे नाहीतर तुला संपवून टाकतो अशी धमकी दिली. दुसऱ्या चोरट्याने फिर्यादीला मारहाण केली व पैसे कोठे आहेत अशी दमदाटी करू लागला.

तिसऱ्या चोरट्याने सुद्धा, तुझा मर्डर करून टाकतो असे म्हणत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून फिर्यादीने ट्रकच्या कप्प्यामध्ये पैसे असल्याचे सांगितले. त्याने कप्प्यातील 56 हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण ट्रक मधून खाली उतरून बाहेर टेहळणी करीत होता. जाता जाता चोरट्यांनी फिर्यादी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेतला व तुम्ही जर पोलिसात तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

सदर घटनेनंतर फिर्यादी यांनी दि. 9 ऑक्टोबर रोजी दौंड पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.