केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे आजपासून यात्रौत्सव सुरु झाला आहे. या ठिकाणी विविध दुकाने थाटण्यात आली असून येथील नागरिक आणि पाहुण्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. मात्र यात्रेच्या या मोठ्या धामधूमीत एक भयंकर घटना घडण्या अगोदर वायरमन ने वेळीच लक्ष दिल्याने टळली आहे.
केडगाव गावातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी वीज वाहिनीची तार पूर्णपणे जीर्ण होऊन तुटली होती. ती फक्त शेवटच्या एका तारेवर जुडून राहिली होती जी काही वेळातच तुटून खाली पडणार होती. ही गंभीर बाब कुणाच्या ध्यानीमनीही नव्हती. मात्र दररोजच्या सवयी प्रमाणे तेथे पेट्रोलिंग करत चाललेले वायरमन हनुमंत जगताप यांना येथे काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले.
त्यांनी व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर मात्र त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली कारण ही वीज वहन करत असलेली तार काही वेळातच तुटून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून मोठा अपघात घडणार होता. हनुमंत जगताप यांनी वेळ न दवडता त्वरीत याची माहिती वरिष्ठान्ना देऊन लाईट सप्लाय बंद केला आणि त्वरीत वरिष्ठ तंत्रज्ज्ञ डी.एन. कांबळे यांना बोलवून घेत काही वेळात वीज वाहक तार जोडून पुढील होणार अनर्थ टाळण्यात त्यांना यश आले.
ऐन यात्रेच्या धामधूमीत केडगावमध्ये मोठा अनर्थ घडला असता मात्र वायरमन हनुमंत जगताप यांच्या तत्परतेने हा अपघात टाळण्यात यश आले आहे. हनुमंत जगताप आणि वरिष्ठ तंत्रज्ज्ञ कांबळे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.