दलित-मुस्लिम-ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दौंडमध्ये निषेध मोर्चा, ख्रिश्चन महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने लक्ष वेधले

अख्तर काझी

दौंड : संपूर्ण देशामध्ये सध्या दलित, मुस्लिम, ख्रिश्चन या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे याचा आज दौंड शहरात निषेध करण्यात आला. तिन्ही समाजातील बांधवांनी शहरातून निषेध मोर्चा काढीत आपल्या भावनांना वाट करून दिली.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. ख्रिश्चन समाजातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. शहरातील पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ येथे मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी आंदोलकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

या ठिकाणी झालेल्या निषेध सभेमध्ये रतन जाधव, भारत सरोदे, अमित सोनवणे, मतीन शेख, नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे, पगी मॅडम व पास्टर बेंजामिन तिवारी यांनी आपले प्रखर विचार मांडले. तसेच या तिन्ही समाजावर होणारे अन्याय थांबले नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मणिपूर येथील घटनेने देशाची मान संपूर्ण जगासमोर झुकली आहे याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गांभीर्य नाही. या घटनेवर ते एक शब्दही बोलायला तयार नाही अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला असताना आम्हाला या ठिकाणी न्याय का मिळत नाही असा सवालही उपस्थित करण्यात आला.
समाजाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मणिपूर येथे दोन बहिणींवर अन्याय अत्याचार करून त्यांची नग्नधिंड काढण्यात आली, या घटनेमध्ये सामील असलेल्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मणिपूर येथील घरे ,चर्च जाळण्यात आली आहेत त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.


दलित -मुस्लिम -ख्रिश्चन व बौद्ध समाजावर होणारे अन्याय कमी झाले पाहिजेत, धर्मांतराच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, राज्य घटनेचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तिरंग्याचा अवमान करून भारतीय स्वातंत्र्य दिवस हा काळा दिवस समजावा अशी गरळओकणाऱ्या संभाजी भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, गोवंश च्या हत्येखाली व लव जिहाद च्या नावाखाली मुस्लिम समाजावर होणारे अन्याय थांबविले पाहिजेत, मुस्लिम समाजाची घरे व धार्मिक स्थळे अतिक्रमणच्या नावाखाली तोडली जात आहेत ते थांबविले पाहिजे, सांगली जिल्ह्यातील बेडत गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेली कमान उध्वस्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, नांदेड येथील अक्षय भालेराव याची जातीय द्वेषातून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व भालेराव कुटुंबीयास आर्थिक मदत करण्यात यावी. या मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.