अख्तर काझी
दौंड: शहरातील जनता कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरांच्या बंद फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पार्थ लक्ष्मीकांत सप्तर्षी (रा.कॅनरा बँकेच्यावर ,जनता कॉलनी,दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 10.45 वा. च्या दरम्यान घडली. फिर्यादी दि. 29 सप्टेंबर रोजी दु. 3 वा. च्या दरम्यान आपले डॉक्टर वडील व कुटुंबीयांसमवेत घराला कुलूप लावून आपल्या अहमदनगर येथील नातलगाकडे गेले होते. त्याच दिवशी रात्री 10.45 वा. सुमारास ते परत घरी आले. घरात आल्यानंतर त्यांना दोन्ही बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, हॉलमधील गॅलरीचा दरवाजाही उघडाच दिसला.
चोरट्यांनी गॅलरी शेजारी असलेल्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला असावा त्यामुळे खिडकीचे गज तुटलेल्या अवस्थेत दिसत होते. यावेळी फिर्यादी यांनी तेव्हा त्यांनी कपाटातील वस्तूंची पाहणी केली असता, कपाटातील सोन्याचे दागिने (40हजार रु), व रोख रक्कम 32 हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.