केडगावातील ‘कुल-कापरे’ गट एकाच नाण्याच्या दोन बाजू, सत्ता राखून ‘भ्रष्टाचार’ लपवता यावा यासाठी दोन्ही गटांची मिलिभगत : राजेंद्र महादेव शेळके


केडगाव | केडगाव (ता. दौंड) येथील कुल आणि कापरे गट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी वेळोवेळी नवनवीन डावपेच वापरून एकत्र सत्ता भोगली आहे. आताही त्यांना तेच करायचे असून केडगावची जनता यांना पुरती वैतागली आहे. त्यामुळे यांनी जनतेवरच राजकीय डाव टाकून दोन स्वतंत्र पॅनल उभे करून थोरात गटाची मत विभागणी कशी करता येईल आणि पुन्हा सत्तेवर आपल्यालाच कसे राहता येईल याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता जनता पेटून उठली असून सौ. वनिता (संताजी) मनोज शेळके या किटलीच्या चिन्हावर भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास नागेश्वर विका सोसायटीचे मा. चेअरमन राजेंद्र महादेव शेळके यांनी केला आहे.

हीच ती चौरंगीनाथ महाराज पहाडावरील 1 कोटी 96 हजाराची पाणी पुरवठा योजना जीच्या मध्ये एक थेंबही पाण्याचा आलेला नाही

कोटींचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी दोन्ही गटांची मिलिभगत.. गेल्या दहा-पंधरा वर्षात विकास कामांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. कापरे यांच्या काळात ज्या विहिरी खोदण्यात आल्या, पाईपलाईन करण्यात आली त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राजेंद्र शेळके यांनी करत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी 50 फूट विहिरी खोदण्यात आल्या असे दाखवून फक्त 20 फूट विहिरी खोदून, चार इंची पाईपलाईन केली असे दाखवून बिले काढण्यात आली मात्र पाणी पुरवठा करण्यात आला नाही. 1 कोटी 8 लाख 96 हजार 410 रुपये इतका जो निधी आला आणि टाक्या बांधण्यात आल्या त्या टाक्यांमध्ये अजून एक थेंब पाणी का आले नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

पोलखोल विकासकामांची

केडगाचे ग्रामदैवत नागेश्वराचा पालखी मार्ग रस्ता अजूनही काँक्रिटी करणाच्या प्रतीक्षेत आहे. जगताप, लोणकर, मुस्लिल वस्तीतील गावचे मुख्य रस्ते अजून मातीचेच आहेत हा तुमचा विकास म्हणायचा का..? असा सवाल राजेंद्र शेळके यांनी उपस्थित करत गावात 25-25 लाखांचे रस्ते दोन वर्षांत उखडतात ही गावठाणातील परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. जनता आता यांना चांगलेच ओळखून आहे त्यामुळे यावेळी बदल होऊन माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्हदर्शनाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ.वनिता संताजी (मनोज) शेळके या भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास नागेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र महादेव शेळके यांनी व्यक्त केला आहे.

व्यक्ती एक चेहरे अनेक – राजेंद्र शेळके यांचा घणाघात केडगावच्या मागील पंचवार्षिक निवडणूकिवेळी बाळासो कापरे यांनी कुल गटाचे उमेदवार अजित शेलार यांचा प्रचार केला. निवडणूक प्रचारावेळी मोठे आरोप प्रत्यारोप झाले हे सर्वांनी पाहिले होते. दरम्यान कुल गटाचा सरपंच निवडून आल्यानंतर कापरे गायब झाले आणि थेट पुन्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकीवेळीच प्रकट झाले. यावेळी बाळासो कापरे यांनी थोरात गटातील काही कार्यकर्त्यांना गाव विकासाच्या गप्पा मारून आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढून परिवर्तन करू अशी भलावणी केली आणि अचानक आपला नविनच पॅनल आणि सरपंच पदाचा उमेदवार निवडणुकीत उभा केला. हे त्यांच्यासोबत असणाऱ्या थोरात समर्थकांनाही धक्का देणारे होते. हे अचानक नव्हतेच तर हे कुल आणि कापरे या दोन्ही गटांनी एकत्र बसून सत्ता मिळविण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र होते असा आरोप राजेंद्र शेळके यांनी करत, अनेक वर्षे सत्ता भोगूनही विकास कामे झाली नाही मात्र भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाला त्यामुळे जनता आपल्याला नाकारणार आहे हे लक्षात येताच कुल-कापरे गटाने एकत्र येऊन थोरात गटाला शह देण्याची व्युह रचना आखली आणि ठरल्याप्रमाणे कापरे यांनी ऐनवेळी थोरात गटातील काही महत्वाचे कार्यकर्ते फोडून आपला नविन पॅनल तयार करत थोरात गटाचे उमेदवार पाडण्यासाठी हे षडयंत्र रचले असा घनघाताह त्यांनी केला.

फक्त सत्तेसाठी हे लोक वेगवेगळे असल्याचे दाखवत आहेत मात्र आतून हे एकच आहेत. कापरे यांनी थोरात गटाला अंधारात ठेवून थोरात गटातीलच काही कार्यकर्ते हाताशी धरून गुपचूप स्वतःचा पॅनल उभा केला आहे. जेणेकरून थोरात गट कमजोर होईल आणि कुल गटाला विजय मिळवणे सोपे जाईल. मात्र हे राजकीय षडयंत्र जनतेसमोर उघडे पडले आहे आणि आता जनता पेटून उठली असून ग्रामविकास परिवर्तन पॅनल थोरात गटाच्या वनिता मनोज शेळके यांना पाठिंबा वाढत चालला आहे हे यावरून स्पष्ट होत आहे असेही शेवटी राजेंद्र महादेव शेळके म्हणाले.