अख्तर काझी
दौंड : भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळविण्यासाठी वेगवेगळी अभियाने राबविण्याचे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ‘घर चलो अभियान’ संपूर्ण देशभर- राज्यभर सुरू आहे. या अभियानांतर्गत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दौंड शहरातील नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी, टपरीधारकांशी दि. 13 रोजी संवाद साधणार आहेत, त्या निमित्ताने येथील शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
अभियानाबाबतची माहिती देण्यासाठी पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे ,शहराध्यक्ष स्वप्निल शहा ,ज्येष्ठ नेते नंदू पवार उपस्थित होते. यावेळी वासुदेव काळे म्हणाले की, महाविजय 2024 मध्ये संपूर्ण राज्यातील 48 जागांपैकी 45 जागा जिंकण्याचे भाजपाचे ध्येय आहे.या संकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने कार्यक्रम आखले आहेत. सर्वसामान्य माणसापर्यंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येतात म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील 60 हजार घरांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.
त्याचाच एक भाग म्हणून बावनकुळे दौंडकरांशी संवाद साधणार आहेत. सामान्य माणसाच्या मनात काय विचार चालले आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं बद्दल त्याचे काय विचार आहेत, भाजपा बद्दल त्याचे काय विचार आहेत याची माहिती घेऊन भविष्य काळामध्ये पक्षाला काही बदल करता येईल का याचा अंदाज या अभियानातून येणार आहे असे काळे म्हणाले. दौऱ्यामध्ये उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे प्रभारी राजेश पांडे, दौंड चे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर ,हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ सहभागी होणार असल्याची माहिती वासुदेव काळे यांनी यावेळी दिली.