दौंड : तालुका पंचायत समितीची वार्षिक आमसभा म्हणजे ग्रामीण विकासाची ब्लु प्रिंट आहे, परंतु मागील अनेक वर्षापासुन आमसभा घेण्यात पंचायत समितीमध्ये उदासिनता दिसुन येत असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके यांनी केला आहे.
वसंत साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड विधानसभा मतदार संघातील पंचायत समितीकडुन तालुक्यात गेली अनेक वर्षे आमसभा घेतली गेलेली नाही. शासन धोरणानुसार घेतली जाणारी आमसभा म्हणजे जनतेचे व्यासपीठ असुन लोक प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समक्ष जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होणे, ही आमसभेची संकल्पना असते यामुळे विशेष करून ग्रामीण जनता आमसभेची आतुरतेने वाट पाहत असते परंतु गेली अनेक वर्षापासुन दौंड तालुक्याची आमसभाच झालेली नसल्याने आमसभा घेण्याची तरतुदच रद्द झाली काय? असा समज जनतेचा झालेला असल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे.
दौंड तालुक्यात तहसिल कार्यालय, पंचायत समिती, संजय गांधी व श्रावण बाळ
योजना, वीज कंपनी, सिटी सर्व्हे, कृषी विभाग, आरोग्य विभाग, एमआयडीसी आदी ठिकाणी जनतेचे, शेतकरी बांधवाचे, तसेच अंपग व दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न असुन आमसभा घेतल्यास निश्चितपणे अशा प्रश्नांची सोडवणुक होऊन सर्वसामान्य जनतेला न्याय
मिळणार आहे. तरी अशी महत्वपुर्ण आमसभा लवकरात लवकर घेण्यात यावी अशी विनंती त्यांनी गटविकास अधिकारी यांना केली आहे.