सुधीर गोखले
सांगली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील प्रसिद्ध देवस्थान सोनारसिद्ध देवस्थानच्या देवालाच चोरटयांनी आपले लक्ष केले. गुरुवारी मध्यरात्री हा दरोडा पडला यामध्ये सुमारे १६ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे अनेकविध दागिने चोरटयांनी लंपास केले. जवळजवळ साडे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि १६ किलो चांदीवर चोरटयांनी डल्ला मारला. यामुळे आटपाडीतच नाही तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोनारसिद्ध हे मंदिर प्राचीन आहे. या मंदिराच्या भोवताली दगडी भिंतीचे उंच बांधकाम आहे. सुरक्षेसाठी सीसी टीव्ही आहेत तरीही चोरटयांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील असलेले सोन्या चांदीचे दागिने मंदिरातील पुजारी वर्गाने नेहमीप्रमाणे एका पिशवीमध्ये भरून ठेवले होते. गाभाऱ्याला कुलूप लावलेले नसते याचाच फायदा चोरटयांनी घेतला असावा असा कयास लावला जात आहे.
रात्री अकरा ते पहाटे चार च्या दरम्यान चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि गाभाऱ्यातील पिशवीत असणाऱ्या सोन्याची बोरमाळ, गंठण, लक्ष्मीहार, फुले, लहान मोठी डोरली असे एकूण दहा तोळे सोने त्याचप्रमाणे चांदीचा एक तब्बल सहा किलो वजनाचा घोडा, सहा किलोचा फेटा, दोन किलो वजनाची नाण्याची माळ, गणपती, चांदीचा छोटा घोडा, करदोटे असा एकूण १६ किलो च्या ऐवजावर चोरटयांनी हात साफ केल्याचे निष्पन्न झाले आहे. पहाटे पुजाऱ्यांना जाग आली त्यावेळी घडलेली घटना सर्वांच्या लक्षात आली. तातडीने घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली.
चोरी ची घटना घडल्यानंतर ठसे तज्ञांसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने मंदिरासमोरील रस्ता पर्यंत माग काढला परंतु नंतर तेही घुटमळले. या मंदिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी चे दागिने असून सुद्धा कोणतीच अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सी सी टीव्ही कॅमेरे आहेत मात्र ते बरेच दिवस बंद अवस्थेत असल्याने याचा फायदा चोरट्यांनी उचलला असल्याचे बोलले जात आहे. मंदिराचे पुजारी नामदेव अप्पा पुजारी (वय ७२ रा. देशमुखवाडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद नेमाणे करत आहेत.